- शहरात विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२१) :- कोरोना तसेच ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या पिंपरी चिंचवड शहरात वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे.
सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांकडून मोठा जल्लोष केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ३१) रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरात ठिक-ठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात येणार आहे. संशयित वाहन व चालकांची तपासणी करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत २९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी उपायुक्त ३, सहायक आयुक्त ६, निरीक्षक ३३, सहायक/उपनिरीक्षक ९७, कर्मचारी ६३५, राज्य राखीव दलाची तुकडी १, नियंत्रण कक्षाकडील राखीव तुकडी २ अशा ७७५ पोलिसांचा फाैजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गुन्हे शाखा व विशेष शाखा यांची सहा फिरती पथके नियुक्त केली आहेत. शहरातील अंतर्गत भागात देखील ही पथके गस्त घालणार आहेत. तसेच शहरातील काही भागातील वाहतूक देखील वळवण्यात आली. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक शाखेकडून देखील नियोजन केले असल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले.
















