न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२१) :- दररोज १०० किलो ओला कचरा निर्माण होणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांना स्वतःचा कंपोस्टिंग प्लांट कार्यान्वित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नियमांकडे शहरातील सोसायट्या दुर्लक्ष करीत आहेत. अशा सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी (दि. ३०) दिला आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांनी ओला, सुका व घरगुती घातक कचरा विलगीकरण करणे आणि ओल्या कचऱ्यावर स्वतः सोसायटीच्या परिसरामध्ये कंपोस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज १०० किलो ओला कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना हा नियम लागू आहे.
शहरात साडेचार हजारांपेक्षा अधिक सोसायट्या आहेत. वारंवार स्मरणपत्रे व सूचना देऊनही अनेक सोसायट्यांनी महापालिकेस सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तसेच, कंपोस्टिंग प्लांट सुरू केले नाहीत. त्या सोसायट्या कचरा विनापरवाना विक्रेत्यांकडे देतात. ते विक्रेते तो कचरा मोकळ्या जागेवर नेऊन टाकतात. त्यामुळे अस्वच्छता पसरत आहे. शहरातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांना आयुक्त पाटील यांनी अंतिम इशारा दिला आहे. लवकरात लवकरत कंपोस्टिंग प्लांट कार्यान्वित करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.


















