- शाळा, लग्न, कार्यक्रमांवर टाच; नो मास्क – नो एंट्रीचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२१) :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी आज शुक्रवारी नवी नियमावली जारी केली आहे.
३१ डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे.
काय आहेत नवे निर्बंध?
१. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी
२. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी.
३. अंत्यविधीसाठी २० लोकांच्या उपस्थितीची परवानगी
४) सर्व शाळा, महाविद्यालये, दुकाने, खाजगी व सरकारी कार्यालये, बँका, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार, मॉल, मालक व इतर आस्थापनांनी / व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सर्व व्यवस्थापक, अधिकारी तसेच कर्मचा-यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पुर्ण झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचा-यांची यादी (लसीकरण माहिती / प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम प्रधिका-यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी. तसेच सर्व सामान्यपणे काही अपवादात्मक परिस्थिती / अति तातडीची बाब वगळता त्यांच्या कार्यालयात किंवा आस्थापनेत येणा-या सर्व नागरिकांनाही लसीकरणाच्या दोन मात्रा पुर्ण केल्याची खात्री करूनच प्रवेश देण्यात यावा. (नो मास्क – नो एंट्री, नो वॅक्सीन – नो एंट्री)
५) परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा.
६) यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.