न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- कंपनीतून सुटल्यानंतर चिखलीमधील एका गोठ्यामध्ये सफाईच्या कामासाठी मयत इसम जात होते. जाधववाडी येथून रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ते एका दुकानात घुसले. मात्र, आरोपींनी त्यांना दुकानाबाहेर ओढले आणि त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ही घटना शुक्रवारी (दि. ३१) रात्री नऊ वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली. सुनील शिवाजी सगर (वय ३५, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. चिखली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.