- अन्यथा होईल पाचशे ते पंचवीस हजार रुपये दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील मोकळ्या प्लॉट्समध्ये अस्वच्छता करणा-या व्यक्ती, आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. पाचशे ते पंचवीस हजार दंड आकारणी करण्यात येणार आहे.
आदेशात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरामध्ये स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अस्वच्छता पसरविणा-या व्यक्ती, आस्थापनांविरुध्द दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. शहरामध्ये विविध भागांमध्ये मोकळे प्लॉट्स असून त्याठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याचे वारंवार निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे अशा मोकळ्या प्लॉट्समध्ये कचरा टाकणा-या अथवा कचरा टाकण्यास कारणीभूत ठरणा-या व्यक्ती, आस्थापनांविरुध्ददेखील दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.
शहरातील सर्व मोकळे प्लॉट्स, भूखंडावर असलेली अस्वच्छता सर्व भूखंडधारकांनी तातडीने स्वच्छ करावी. यापुढे कोणत्याही मोकळ्या प्लॉट, भूखंडामध्ये कचरा टाकतांना व्यक्ती आढळून आल्यास त्या व्यक्तीविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल. छोट्या स्वरुपात कचरा टाकणा-या व्यक्ती, आस्थापनेविरुध्द ५०० रुपये तर, मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्यास ५००० ते २५००० इतकी रक्कम दंड अथवा प्रशासकीय शुल्क म्हणून आकारण्यात येईल. मोकळ्या भूखंडामध्ये अस्वच्छता होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या जागेच्या मालकाची असल्याने मोकळ्या प्लॉटमध्ये अस्वच्छता झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जागा मालकावरसुध्दा दंडात्मक अथवा प्रशासकीय शुल्क वसुलीची कारवाई करण्यात येईल, असे आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे.