- रिस्क टाळण्यासाठी कोविड सेंटर आणि जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील दोन कोविड केअर सेंटर आणि नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालय सुरू करण्याची तयारी केली आहे. महापालिकेने रुग्णालयातील ४२४९ आयसीयू बेड आणि १ हजार ८०० ऑक्सिजन बेड तयार ठेवले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
ढाकणे म्हणाले, पिंपरी – चिंचवड शहरात सध्या ६ हजार ६९४ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी ६ हजार २६९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४२५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण ६१ नागरिक ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी ३३ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
शहरात दररोज १ हजार २०० ते १ हजार ५०० कोरोनाबाधित आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये लक्षणे विरहित रुग्णांची संख्या अधिक आहे. तरीही, येत्या काळात रुग्णसंख्या वाढून आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. महापालिकेने सीसीसी सेंटर आणि जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घरकूलमधील २०० खाटांचे एक सीसीसी सेंटर सुरू करण्यात येणार आहे.