- संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने स्वतंत्र बदली धोरण तयार केले. परंतु, तरीही राजकीय पदाधिकारी, नगरसेवकांच्या शिफारशी व दबावामुळे बदल्या होतात. या संदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. बदलीसाठी राजकीय नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांमार्फत शिफारस आणून दबाव टाकल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी – चिंचवड महापालिकेने सन २०१५ पासून बदल्यांसाठी नवीन धोरण स्विकारले आहे. त्यानुसार अ, ब, क व ड या चारही वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षांतून फक्त एप्रिल व मे या दोन महिन्यात करणे अपेक्षित आहे. मात्र, नगरसेवक, पदाधिका-यांकडून मर्जीतल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी प्रशासनावर दबावतंत्र वापरले जाते. आयुक्त पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप हस्तक्षेप थांबविण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत आदेश पारित करीत त्यांनी राजकीय दबाव टाकणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
काही अधिकारी व कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाहीत. उलट बदली रद्द करण्यासाठी राजकीय पदाधिकारी व अशासकीय व्यक्तींमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून प्रशासनास वेठीस धरणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सचोटी संशयास्पद ठरते. त्यामुळे या गैरवर्तणूकीबाबत अशी राजकीय दबावाबाबतची कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ (१) (एक) (तीन) व २३ चे उल्लंघन करणारी आहे. हे प्रकार घडल्यास संबंधित अधिकारी, कमचा-याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय दबावतंत्राचा वापर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गोची झाली आहे.


















