- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर बेशिस्त नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्तरित्या शहरासाठी १६ भरारी पथके स्थापन केली आहेत. करोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर या पथकांकडून कारवाई होणार आहे. विनामास्क फिरल्यास ५०० रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कडक निर्बंध लागू केले असून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र बेशिस्त नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात.
अशा बेशिस्त नागरिकांवर कारवाईसाठी संयुक्त पथके स्थापन केली आहेत. एक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी अशा पाच जणांचे एक पथक राहणार आहे. प्रत्येक पथकाकडून हद्दीत पाहणी केली जाणार आहे. निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे.