- महापालिकेकडून मोठी दंडात्मक अथवा कारावासाची शिक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- शहरात प्लास्टिक वापराला बंदी असूनही मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत आहे. भरारी पथकेही अपयशी ठरले आहे. त्यामुळे महापालिकेने कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक साहित्य वापरावर शंभर टक्के बंदीचा निर्णय घेत पंचवीस हजार रुपये दंडासह तीन महिने कारावास होणार आहे.
केंद्रीय पर्यावरण विभागाने ऑगस्ट २०२१ मध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा सुधारित नियम लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी जारी केली आहे. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह वस्तूंवर बंदी घातली होती. त्यानंतर आता नव्या नियमानुसार ३० सप्टेंबरपासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांसह, प्लास्टिकच्या अन्य वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.
पुढील टप्प्यात ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक साहित्यावर बंदी घातली जाणार आहे. त्यानुसार महापालिका हद्दीमध्ये कारवाई करण्यात येत आहे.