- पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पॉईंटवर पोलीस बंदोबस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- लोणावळा व मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळे गडकिल्ले, लेण्या, ऐतिहासिक ठिकाणे, स्मारके याठिकाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी मंगळवारपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या फिक्स्ड पॉईंटवर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव कार्ला लेणी, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट, भाजे लेणी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तुंग किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण या प्रतिबंधात्मक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
जमावबंदीनुसार पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती याठिकाणी आढळल्यास त्या कारवाईला पात्र ठरतील, याची सर्वानी नोंद घ्यावी व आदेशाचे पालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.


















