- राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- शहरातील सुमारे पावणे दोन लाख अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्यानुसार नियमित होणार आहेत. त्यासाठी शास्तीकरासह मिळकतकर भरणा करण्याची अट रद्द केली आहे. शास्तीकर वगळून मिळकतकर भरणा करून घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत, अशी माहिती नगरसेवक अजित गव्हाणे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठा प्रश्न अनधिकृत बांधकामांचा आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी गुंठेवारी लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी महापालिकेने १७ डिसेंबर २०२१ पासून सुरू केली आहे. प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू असल्याने शास्तीसह व मिळकतकर भरणा करायला नागरिक तयार नव्हते. मिळकतकर भरणा केल्याशिवाय गुंठेवारी अशक्य होते. त्यामुळेच गुंठेवारीला महिनाभरात प्रतिसाद मिळाला नाही. शास्तीकर वगळून मिळकतकर भरणा करायला लोकं तयार आहेत, पण महापालिकेच्या कर संकलन विभागात प्रथम शास्तीकर भरण्याची सक्ती होत असल्याने गुंठेवारी योजना सुद्धा अपयशी ठरण्याची शक्यता होती.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत निवेदन दिले होते. उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना आदेश दिले. नियमित कर भरणा केल्याची पावती गुंठेवारीसाठी चालेल, असे परिपत्रक ७ जानेवारी २०२२ रोजी महापालिकेने काढले आहे. विकास आराखडा, निळी पूररेषा, रेडझोन रस्ता रुंदीकरणात येणारी अनधिकृत बांधकामे वगळून सर्वाना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे अजित गव्हाणे यांनी सांगितले.