- नॉन कोविड रुग्णांसाठी रुग्णालय राहणार राखीव; पालिकेची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वात मोठे वायसीएम रुग्णालय नॉन कोविड ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी इतर आजारावरील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सोमवारी (दि. १०) दिली.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पहिल्या दोन्ही लाटेमध्ये महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. याठिकाणी ७०० बेडची क्षमता असून सुमारे ९० आयसीयूचे बेड आहेत. त्यामुळे अतिगंभीर रुग्णांवर तात्काळ उपचार करणे शक्य होते. मात्र असे असले तरी यामुळे नॉनकोविड रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. वायसीएम रुग्णालय हे महापालिकेचे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.
या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. तसेच याठिकाणी प्रसुतिसाठी देखील गर्भवती महिलांना दाखल करण्याची संख्या अधिक आहे. कोविडच्या काळात रुग्णालयामध्ये इतर रुग्णांना प्रवेश नाकारल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे वायसीएम रुग्णालय हे नॉन कोविड ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने सुचविले होते. त्यामुळे वायसीएम रुग्णालय है कोरानाच्या तिसऱ्या लाटेमध्ये नॉन कोविड ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.