- दांडके, कोयत्याच्या सहाय्याने आरोपींची परिसरात दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- चिखलीतील मोरेवस्ती अष्टविनायक चौक येथील भाजी मंडईत फिर्यादी आणि इतर भाजीपाला विक्रेते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री सातच्या दरम्यान गुंडागर्दी करणारे आरोपी भाजी मंडईत आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे भाजीपाल्याची हातगाडी लावण्यासाठी प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला.
आरोपींनी भाजी मंडईतील इतर पंधरा ते वीस हातगाडी वाल्यांकडे हप्ता मागितला. अन्य भाजी विक्रेत्यांनी देखील आरोपींना हप्ता देण्यास नकार दिला. ‘तुम्ही आम्हाला हप्ता देणार नाही. मग तुम्ही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय कसे करता तेच आम्ही बघतो’, अशी आरोपींनी धमकी दिली. काही वेळाने पुन्हा लाकडी दांडके, कोयते घेऊन आरोपी आले. भाजी मंडईमध्ये आरडाओरडा व शिवीगाळ करत आरोपींनी भाजी विक्रेत्यांना मारहाण करत त्यांच्या भाजीच्या हातगाड्या उलट्या पालट्या केल्या. आता ही तुमच्यासाठी वार्निंग आहे. हप्ता न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जहिरुद्दीन जफिरुद्दीन शाह (वय ३७, रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील रमेश इब्राहिमपूरकर, प्रशांत शिवाजी हळदमणी, आकाश बाबू नडवीन्मनी, जॉन, विकास (सर्व रा. सिंहगड कॉलनी, चिखली) आणि त्यांचे दोन तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.
















