- दहा वाहनांची तोडफोड; नगरसेविका व कुटुंबाला शिवीगाळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या बिजलीनगर येथील ओम कॉलनी बंगल्याच्या गेटवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तलवार व कायेत्याने वार करून शिवीगाळ केली. तसेच दहा वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि. १२) रात्री ११ च्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वर रामभाऊ सूर्यवंशी ( वय ५६ रा. ओम कॉलनी, चिंचवड) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शिवानंद हेळवे, बसवराज हेळवे, आदित्य आंबुसकर, सोमनाथ माने, श्याम कोळी व त्यांचे इतर साथीदार यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी आशा सूर्यवंशी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन राजकीय वैमनस्यातून फिर्यादी व त्यांच्या मुलाचे नाव घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादीच्या बंगल्याच्या गेटवर तलवार व कोयता मारून फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगा यांना आरोपींनी शिवीगाळ केली. रस्त्यावर पार्क केलेल्या दहा वाहनांची आरोपींनी तोडफोड केली. तसेच, रोहित अनिल पवार यांच्या चारचाकी वाहनातून दहा हजार रुपये आरोपींनी चोरून नेले. आरोपींनी राजकीय वैमनस्यातून हा प्रकार केला आहे, असा आरोप फिर्यादी सूर्यवंशी यांनी केला आहे.