- कारवाईत ऑनलाइन दंड न भरणाऱ्यांनाही पोलिसांकडून अद्दल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- झिरो टॉलरन्स मोहिमेंतर्गत हिंजवडी वाहतूक विभागाने नियमभंग करणाऱ्या ८४४ वाहन चालकांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये पाच लाख ८१ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन दंड न भरणाऱ्या ७१४ वाहन चालकांकडून तीन लाख ६२ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. १२) सकाळी साडेआठ ते दुपारी एक वाजताच्या कालावधीत हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, ८३ कर्मचारी, २१ ट्राफिक वार्डन व जलद प्रतिसाद पथक (आरसीपी) यांच्या नऊ टिम तयार केल्या. भुजबळ चौक, इंडियन ऑईल पेट्रोल पंप, शिवाजी चौक, विप्रो फेज -१, जॉमेट्रिक सर्कल, टाटा टी जंक्शन, विप्रो सर्कल- २, राधा चौक आणि बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी या टीमने कारवाई केली. नियमभंग करणाऱ्या ८४४ वाहन चालकांवर कारवाई करून ५ लाख ८१ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच ज्या वाहन चालकांनी ऑनलाइन पद्धतीने आकारण्यात आलेला दंड भरला नाही अशा ७१४ वाहन चालकांकडून तीन लाख ६२ हजार ७०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.