- स्वच्छाग्रह मोहिमेंतर्गत भाजी मंडई परिसरात कापडी पिशव्यांचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२२) :- स्वच्छाग्रह स्वच्छता मोहिमेंतर्गत कापडी पिशव्यांचा वापर करा, प्रदूषण टाळा या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील भाजी मंडई, व्यावसायिक ठिकाणे, मार्केट या ठिकाणी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.
ज्या नागरिकांनी मार्केटमध्ये प्लॅस्टिक पिशवी आणली होती त्यांना कापडी पिशवी देण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी कापडी पिशव्या मागून घेतल्या तर काहींनी प्लॅस्टिकच्या पिशव्या मनपा कर्मचा-यांच्या हाती सोपवत कापडी पिशव्यांचा स्वीकार केला. ही मोहीम पुढील ८ दिवस सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. कापडी पिशव्यांचे वाटप हा प्रातिनिधीक उपक्रम असून नागरिकांनी स्वतःच कापडी पिशव्या वापरण्याची सवय लावली पाहिजे, घरच्या घरी कापडी पिशव्या तयार करणे सोपे आहे. त्यामुळे दुकानदाराला प्लास्टिकची पिशवी मागण्यापेक्षा एक छोटी कापडी पिशवी सोबत नेली, तर दुकानदारालाही सवय लागेल आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी व्हायला मदत होईल, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. सर्व क्षेत्रीय अधिकारी व सहा. आरोग्याधिकारी यांचे हस्ते क्षेत्रीय कार्यालयातील भाजी मंडईमध्ये कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.
नियमांचे उल्लंघन करणारांवर दंडात्मक कारवाई…
३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी घालण्यात आली आहे. या अधिसूचीची कठोर अंमलबजावणी शहरामध्ये सुरू आहे. यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास पहिला गुन्हा रुपये ५०००, दुसरा गुन्हा रुपये १००००, तिसरा गुन्हा यांस रुपये २५००० दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा आहे.















