- पालिकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार होर्डिंगची निविदा रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत महापालिकेच्या जागेत एकूण ३२३ जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी सन २०१८-१९ मध्ये निविदा राबविली होती. ठेकेदारांचा अल्प प्रतिसाद, कागदपत्रांची वेळेत पूर्तता न करणे तसेच विविध कारणांमुळे ती प्रक्रिया लांबणीवर पडली. अखेर ती निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे.
शहरात केवळ ६४ ठिकाणच्या होडिंगला ७ वर्षे कालावधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पुढे महापालिका स्वतः जाहिरात होर्डिंग उभे करणार आहे. आकाशचिन्ह परवाना विभागाने शहरातील एकूण १८५ व १३८ असे एकूण ३२३ ठिकाणी जाहिरात होर्डिंग उभारणे व ७ वर्षांसाठी जाहिरात लावण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. एकूण १८५ पैकी ८२ ठिकाणांना प्रतिसाद मिळाला नाही. तसेच, दर कमी असल्याने ती निविदा रद्द करण्यात आली.
उर्वरित १०३ पैकी ६४ ठिकाणसाठी ठेकेदारांनी कागदपत्रांची वेळेत पुर्तता केल्याने त्यांना वर्कऑर्डर देण्यात आली आहे. तर, शिल्लक ३९ ठिकाणची निविदा रद्द करण्यात आली आहे. तर, एकूण १३८ ठिकाणच्या निविदापैकी ७९ ठिकाणांना प्रतिसाद मिळाला. त्यापैकी १३ ठिकाणे पूर्वीचे रद्द करण्यात आली आहेत. उर्वरित ६६ ठिकाणच्या होर्डिंगसाठी ठेकेदारांनी वेळकाढूपणा केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या सर्व होर्डिंगची निविदा रद्द करण्यात आली आहे. महापालिकेच्या नव्या धोरणानुसार महापालिका स्वतः जाहिरात होर्डिंग उभारणार आहे.















