- कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाचा परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२२) :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आकुर्डी येथील तहसील कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्राच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच, विविध दाखल्यांसाठी दररोज ५० टोकन तर, प्रतिज्ञापत्रासाठी १५ टोकन दिले जात आहे. अर्ज स्वीकृतीसाठी यापूर्वी सकाळी १० ते दुपारी १ अशी वेळ होती. ही वेळ आता बदलण्यात आली आहे.
सध्या अर्ज स्वीकृतीसाठी सकाळी १० ते दुपारी १२ अशी वेळ निश्चित केली आहे. त्याशिवाय, अर्ज स्वीकारण्यासाठी ५० टोकन या वेळेत दिले जात आहे. एका व्यक्तीकडून एक किंवा एकापेक्षा अधिक अर्ज येत असल्याने सध्या दररोज सरासरी ७० ते ८० अर्ज नागरिक सुविधा केंद्रात जमा होत आहेत. नवीन नियम लागू करण्यापूर्वी येथे दररोज सरासरी १०० अर्ज येत होते.
प्रतिज्ञापत्रांसाठी १५ टोकन दिले जात आहे. मात्र एका टोकनवर एक ते दोन अर्ज येतात. त्यानुसार दररोज २० ते २५ प्रतिज्ञापत्र होत आहे. दाखले वाटप करण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणासाठी लागणाऱ्या दाखल्यांचे अर्ज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्वीकारले जात आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनमान्य महा ई सेवा केंद्रातही नागरिक दाखले जमा करू शकतात.















