- तब्बल ६४० चौकांत ३ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरातील वर्दळीचे चौक बाजारपेठा, उद्याने, कार्यालये, रुग्णालय अशा ठिकाणी एकूण ४ हजार ५९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिस व नगरसेवकांच्या मागणीनुसार शहरातील आणखी ६४० चौकांत एकूण ३ हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर पोलिसांच्या रडारवर येणार आहे. त्याकरीता १७९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
शहराच्या कायदा व सुरक्षेसाठी पालिकेतर्फे शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. पालिकेने आतापर्यंत २ हजार २०० कॅमेरे बसविले आहेत. तर, राज्य शासनाच्या गृह खात्याने ८८ चौकात २९७ कॅमेरे लावले आहेत. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने ४३० चौकांत एकूण २ हजार ९३ कॅमेरे उभारले आहेत. पोलिस व पालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष त्या चौकांची पाहणी करून १ हजार ४४० चौकांची यादी निश्चित केली. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ८० चौक असे ६४० चौकांची अंतिम यादी तयार केली आहे. त्या ठिकाणी एकूण ३ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्या कामासाठी टेन्कोसिस सिक्युरिटी सिस्टीम व मॅट्रीक्स सिक्युरिटी अॅण्ड सर्व्हेलन्स या दोन कंपन्या पात्र ठरल्या.
निगडीतील स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या कमांड अॅण्ड कंट्रोलद्वारे नियंत्रण प्रणालीनुसार हे कॅमेरे पालिका उभारणार आहे. कॅमेरे ४ मेगा पिक्सल क्षमतेचे असून, अंधारातही चित्रीकरण होणार आहे. कॅमेरे बसविणे, त्यासाठी खांब उभारणे, वीजजोड देणे, केबल नेटवर्क ते ते कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरशी जोडणे आदी कामे वर्षभरात पूर्ण केली जातील, असे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून सीसीटीव्ही कॅमेरे उभारणारी पिंपरी – चिंचवड पालिका देशातील पहिली महापालिका आहे, असा दावा दूरसंचार विभागाने केला आहे.











