न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जाने.) :- फडणवीस आज बोंबलले की, ज्यांना हिंदूत्व पाहिजे ते आमच्या सोबत येतील. ज्यांना नको आहे ते येणार नाहीत, अशी बरीच काही मुक्ताफळे फडणवीस यांनी उधळली. “हिंदूत्व” हा शब्द त्यांच्या तोंडून शोभून दिसत नाही. चार वर्षात या मुख्यमंत्र्याने हिंदूत्वासाठी असे एक तरी काम केले? याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील हिंदूंना द्यावे, अशा शेलक्या शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गोरेगाव-तिरोडा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा प्रदेश अध्यक्ष शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
हिंदूत्व म्हणजे? याची व्याख्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांनी जगाला सांगितली. या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांची आम्ही इज्जत करतो. परंतु, या देशाशी नफरत करणाऱ्यांना पाकीस्तानी लोकांना फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी संरक्षण पुरविले. पाकीस्तानचा कांदा या महाराष्ट्रात आणून महाराष्ट्रातील हिंदू शेतकऱ्यांना भीकेला लावणारे हेच मुख्यमंत्री आहेत. मग मुख्यमंत्री कोणत्या हिंदूत्वाची गोष्ट करीत आहेत..?
साडे चार वर्षात हिंदूत्वाचे प्रतिक असलेल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे काय झाले..? नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराबाबत एक पाऊलसुद्धा उचलले नाही. फडणवीस यांनी एकदा तरी प्रभू रामाची पुजा केली का..? जर तुम्हाला प्रभू रामाबद्दल सहानुभूती नसेल तर हिंदूत्व हा शब्द तोंडात घेऊ नका.. हिंदूत्वाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या लोकांनी शिवसेनेला हिंदूत्व शिकवू नये.
युती होईल न होईल हा काळ ठरवेल. परंतु, शिवसेनेला ब्लॅकमेल कराल तर शिवसैनिक कदापी सहन करणार नाही व शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्यास त्यावेळेस हिंदूत्वाचा अर्थ तुम्हा ढोंग्यांना समजून येईल. आजकालच्या चिंधी चोर लोकांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये. हिंदूत्वासाठी घरादार जाळून आम्ही कोळशाचा व्यापार केला आहे. हिंदूत्वासाठी आमच्या शिवसैनिकांचे दिवसाढवळ्या ‘मर्डर’ झालेले आहेत. त्या घरात अजूनही चूल पेटविली जात नाही. मग तुम्ही लोक आम्हाला हिंदूत्व शिकविणारे कोण आहात..? असा प्रश्न युवराज दाखले यांनी यावेळी उपस्थित केला आहे.











