- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भीष्मगर्जना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२२) :- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेटी देत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यात पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी या भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.
नवी सांगवी येथील एका जनसंपर्क कार्यालयाचे त्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
खडसे म्हणाले, पिंपरी – चिंचवड महापालिकेत माझ्यामुळे सत्ता आली होती. ती आता बदलायची आहे. मी पुन्हा पुन्हा येणार म्हणणारे आज कुठे आहेत. भाजपाकडून ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला जातो ते मला मान्य नव्हते. मी सायकलवरून प्रचार केला. पक्षाने मला डावलले ही अनपेक्षित बाब होती. तसेच खानदेशचा मुख्यमंत्री झाला नसल्याची खंतही व्यक्त केली. चंद्रकांत पाटील हे सरकार पाडण्याचा मुहूर्त काढतात. पण तो मुहूर्त निघूच शकत नाही. पिंपरी – चिंचवड शहरात चोवीस तास पाणी पुरवण्याची घोषणा खोटी ठरली असून पाण्यासाठी नागरिकाना त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यास सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांना जेल मध्ये पाठवणार असल्याचे ते म्हणाले.


















