- खास वाचकांसाठी… नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचा विशेष लेख…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२२) :- आपल्या लतादीदी आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच्याबद्दलची माहिती व्यक्त करणे म्हणजे चंद्र व सूर्याची ओळख करून दिल्यासारखे होईल. परंतु; निश्चितच मला म्हणजे विशेषता: माझ्या आयुष्यातील अविस्मणीय क्षण या निमित्ताने काही आठवणी सांगाव्याशा वाटतात. प्रथम म्हणजे नादब्रम्ह परिवाराच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले आल्या होत्या. त्याच कार्यक्रमात माझी आणि बाळासाहेब तथा पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांची नादब्रम्ह परिवाराच्या माध्यमातून ओळख झाली. साधारण २००१ साल असेल. त्याच व्यासपीठावर आमच्या नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने मा. आशाताईंच्या नावे पुरस्कार देण्याची घोषणा आम्ही केली; त्यानंतर बाळासाहेब आणि माझ्या निरंतर भेटीगाठी होत गेल्या.

असेच एकदा बोलता बोलता हृदयनाथजींच्या बोलण्यातून आले की, आपण आशाताईंच्या नावे पुरस्कार देत आहोत तर, सुरुवात आपण आनंदघन अर्थात लतादीदी यांना पहिला पुरस्कार देऊन करू. मला काही सुचेनासे झाले. एवढा मौलिक आणि अविस्मरणीय क्षण पिंपरी चिंचवड शहरातील रसिकांना अनुभवायला मिळणार आणि त्याचे सारथ्य करण्याचे सौभाग्य मला मिळणार या कल्पनेनेच मी भारावून गेलो. बाळासाहेब मंगेशकर यांनी मला सांगितले की, तू स्वतः दीदींची भेट घे आणि त्यांना भेटून हा पुरस्कार स्वीकारण्याचे निवेदन दे. आपण एखाद्या महान व्यक्तीबद्दल अशी कल्पना करतो कि, त्या कशा असतील? आपल्याशी व्यवस्थित बोलतील का? माझ्या मनात भीती होती कि एवढ्या मोठ्या प्रतिभावान आणि भारतरत्न लतादीदींचा स्वभाव कसा असेल? काही लोकांनी मला सांगितले होते की, त्या कुणाशीही बोलत नाहीत, खूप कडक आहेत; त्यामुळे दीदींबद्दल माझ्या मनामध्ये कुतूहल होते. परंतु, दीदींना भेटणे हा माझ्यासाठी एक दुर्मिळ आणि अविस्मरणीय क्षण होता.
मी धाडस करून लतादीदींना भेटण्यासाठी गेलो. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शेवटच्या मजल्यावर माझ्या माहितीप्रमाणे ८ वा मजला असेल तिथे दीदी बसलेल्या होत्या. मी तिथे गेलो प्रथम त्यांचे दर्शन घेतले; एखादे लहान मुल जसे बोलते त्या पध्दतीचा निरागस स्वर त्यांच्या तोंडून निघाला. मी प्रत्यक्षात लतादीदी समोर बसलो आहे हे मला स्वपनवतच होते. अक्षरशः एखादे लहान मुल आपल्याला एखादा पुरस्कार मिळाल्यावर आनंदाने व कौतुकाने एखाद्या मोठ्या व्यक्तीस तो पुरस्कार दाखवत असतो तसे मला दीदी त्यांना मिळालेले अनमोल असंख्य पुरस्कार दाखवत होत्या. माझ्यासमोर लतादीदी आहेत याचा मला विश्वासच बसत नव्हता. एवढे मोठे व्यक्तिमत्व आणि एवढे लहान होऊन जगणे कदाचित त्यामुळेच त्यांना स्वर सरस्वतीचे रूप प्राप्त झाले असेल. त्यांनी मला तो पुरस्कार स्वीकारल्याचे स्वता:च्या स्वाक्षरीचे पत्र दिले आणि तो शहराच्या वैभवातील ऐतिहासिक सोहळ्याचा अविस्मरणीय क्षण येऊन ठेपला.
महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री कै. रामकृष्ण मोरे सर यांच्या हस्ते पहिला अशा भोसले पुरस्काराचे वितरण करण्याचे ठरले. लहान भगिनीच्या नावे पुरस्कार स्वीकारण्याची मला वाटते भारतातील पहिलीच घटना असेल. तो अविस्मरणीय क्षण आमच्या पदरी आणण्याचे संपूर्ण श्रेय आमचे बाळासाहेब तथा पं. हृदयनाथजी मंगेशकर यांना जाते. आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीकोनातून तो एक मौलिक ठेवा आहे. माणसं येतात आणि जातात पण त्यांच्या हातून घडलेल्या अविस्मरणीय घटना आणि त्यांनी दिलेला ठेवा याच्या नोंदी पिढ्यानपिढ्याच काय पण चंद्र सूर्य असेपर्यंत राहतात. तो क्षण शहराला देण्याचे सारथ्य करण्याची संधी मला मिळाली. सोहळ्यात मी सहज बोलून गेलो कि, दीदी तुम्ही जग फिरता, भारत फिरता एव्हाना पुणे शहरात येऊन जाता; परंतु तुमची संगीत रजनी अद्याप आमच्या शहरामध्ये झालेली नाही, त्यावेळी त्यांनी स्मित हास्य केले. कारण दीदी कमी बोलायच्या. त्यांची प्रतिक्रिया काय होती हे मला त्यावेळी समजले नाही परंतु अवघ्या काही महिन्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला. मोठी माणसं मोठी का होतात हे मला त्यावेळी कळलं.
त्यांनी मुंबईहून माझ्याकडे एका व्यक्तीस कार्यक्रमाचे पासेस घेऊन पाठविले. त्या व्यक्तीने मला विचारले कि किती पासेस हवे आहेत? त्यांना मी म्हणेल तेवढे पासेस देण्यासा तसा आदेशच होता. आणि लतादीदींनी भोईर आलेत का याबद्दल चौकशी केली. त्या काळात ५००० रुपये देणगी होती. मी फक्त दोनच पास घेतले. त्यानंतर मी मंगेशकर कुटुंबामध्ये अक्षरशः विलीन झालो अर्थातच याचे श्रेय आमचे बाळासाहेब तथा हृदयनाथजी मंगेशकर यांना जाते.
त्यानंर मी विचार केला कि पुरस्कार शृंखला चालू राहील शहराच्या नावलौकिकात भर पडत राहील पण कोणती कृती अशी करावी कि मंगेशकर कुटुंब जसे माझ्या अंतकरणात आहे तसेच माझ्या घरातही राहील. त्यामुळे मी जो पहिला चित्रपट निर्माण केला “खेळ सात बाराचा” या चित्रपटामध्ये पं हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत लाभले, आशाताईंनी एक लावणी गायली, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव बैजनाथ मंगेशकर ह्यांनी एक गीत गायिले. लतादीदींनी त्यावेळी गाणे बंद केलेले होते. परंतु माझा हट्ट आणि आग्रहास्तव या चित्रपटामध्ये चार ओळी गाण्यासाठी त्या मुंबईमधील स्टुडीओमध्ये आल्या. चित्रपटाचे गीतकार होते कवी ग्रेस. हा असा दुर्मिळ योगायोग माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून आला आणि मी माझे घर देखील अजरामर करून घेतले.
नंतर गेली २० वर्षे बाळासाहेब मंगेशकर आणि मी एकत्र आहोत. याचा मला सार्थ अभिमान आहे. अजून मला एका गोष्टीचा अभिमान आहे की, मी मंगेशकर कुटुंबाचा एक घटक आहे आणि मंगेशकर कुटुंबीयांनी माझ्या पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक आशा भोसले पुरस्काराच्या नावाने भारतभर पसरविला. याचे सर्व श्रेय पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाते. आजही आम्ही बरोबर आहोत. खरेतर लतादीदी सारख्या व्यक्ती जातच नसतात. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या स्वरांचे वास्तव्य श्वासाच्या माध्यमातून माणसाच्या अंतकरणामध्ये राहील.
माझ्या आणि पिंपरी चिंचवड शहरातील रसिकांच्या, शहरवासीयांच्या आणि नाट्य परिषदेच्या वतीने लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
– भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष :- अ.भा.मराठी नाट्यपरिषद, पिं.चिं. शाखा….


















