- भर रस्त्यातच कर्मचाऱ्यांकडून कच-याचे वर्गीकरण..
- परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- ‘ स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ‘ मध्ये पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा महापालिकेने संकल्प केला आहे. यंदा कचरामुक्त शहराचे सेवन स्टार मानांकन मिरवण्याकरिता महापालिकेने कंबर कसली. शहरात विविध ठिकाणी प्लॉगेथॉन मोहिमेचे आयोजन करून लोकसहभागातून कचरा गोळा करण्याचे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, दुसरीकडे लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरच कर्मचाऱ्यांकडून कच-याचे वर्गीकरण करून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे.

महापालिकेने रस्टन कॉलनी शेजारील चिंचवडेनगर-वाल्हेकरवाडी मूख्य रस्त्यावर गरज नसताना डांबरीकरणासाठी लाखोंची उधळपट्टी केली. रंगरंगोटी केलेल्या रस्त्यावर महिन्याभरातच सगळीकडे कचरा पडलेला दिसतोय. या ठिकाणी पूर्वी कचराकुंडी होती. ती इतरत्र हलविण्यात आली. शिवाय पालिकेची कचऱ्याची गाडी रस्त्यातच थांबते. तिथे कचरा वेचकांकडून कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. परिणामी सर्वत्र दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता आणि आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
परिसरात घंटागाड्या फिरुनदेखील काही नागरिक रहदारीच्या रस्त्यावरच जीव मुठीत घालून रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त करतात. महापालिका यात लक्ष घालून रस्त्यावरील कचऱ्याचे व्यवस्थापन करणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
















