- केंद्राच्या सहसचिवांकडून पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागरमधील कामांची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील स्मार्ट सिटीअंतर्गत कामे वेगाने सुरू आहेत. कामातील ही आघाडी पाहता जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होतील, असा विश्वास केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार यांनी सोमवारी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर येथील विकासकामांची कुणाल कुमार यांनी सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. राजमाता जिजाऊ उद्यान व तेथील वाहनतळ व्यवस्था, रस्ते, पदपथ, खुल्या व्यायामशाळा, बैठक व्यवस्था, सायकल मार्ग आदींचा त्यात समावेश होता.
या भागातील काही नागरिकांशी कुणाल कुमार यांनी संवादही साधला. पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, महाव्यवस्थापक अशोक भालकर आदी उपस्थित होते.
या पाहणीनंतर चिंचवडला ऑटो क्लस्टर येथे बैठक घेऊन कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटीच्या इतर सर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. स्मार्ट सिटीचे प्रकल्प कशाप्रकारे उपयुक्त ठरतील, याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करण्याच्या सूचना कुणाल कुमार यांनी या वेळी दिल्या.
















