न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देण्याच्या आमिषाने ५५ हजार रुपयांची खंडणी घेऊन व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी भाजपचे माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
मोहम्मद तय्यब अली शेख (४५ रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार केशव घोळवे यांच्यासह यादव, घनशाम यादव, मलका यादव, केशवहर अली शेख यांना अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर व्यापारी नेपाळी मार्केट येथे कपड्यांचा व्यापार करतात. त्यांची जागा मेट्रोच्या प्रकल्पात जाणार असल्याने पर्याय म्हणून शासनाकडून फिर्यादी आणि इतर व्यापाऱ्यांना १०० गाळे कायदेशीर मिळणार आहेत; मात्र तरीदेखील आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व इतर व्यापा-यांना महापालिकेकडून गाळे मिळवून देतो असे सांगून ५५ हजार रुपये घेतले.
तसेच, भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडले. त्यानंतर पुन्हादेखील एक लाख रुपयाची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी केशव घोळवे यांच्यासह अन्य आरोपींना २ फेब्रुवारी रोजी अटक केली होती, त्यांची पोलिस कोठडी संपल्यावर मंगळवारी (दि. ८) घोळवे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.
















