- यंदा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी भाजपच्या झोळीत काय दडलयं; अनेकांना उत्सुकता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड.नितिन लांडगे हे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मंगळवारी (दि. २२) सकाळी अकराला सादर करणार आहेत. निवडणुकीपूर्वीच्या या अर्थसंकल्पाबाबत नगरसेवकांसह नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिका अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष आयुक्तांना सादर करतात. यंदा महापालिकेच्या निवडणुका असल्याने अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही अशी चर्चा रंगली होती. महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पाची संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, केवळ अर्थसंकल्प पुस्तिकेची छपाई होणे बाकी आहे. त्यासंदर्भात आयुक्त पाटील यांनी समिती अध्यक्ष लांडगे यांना पत्र देऊन अर्थसंकल्प सादर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार अॅड. लांडगे यांनी अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांना बुधवारी (दि. ९) पत्र देऊन मंगळवारी (दि. २२) सकाळी अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे कळविले आहे. त्यानुसार लेखा विभाग व नगरसचिव विभागाने तयारी सुरू केली आहे. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयानुसार यंदा मिळकतकर व पाणीपट्टीत वाढ केली जाणार नाही, असे दिलासादायक चित्र आहे.
शहरासाठी कोणत्या नव्या योजना व प्रकल्प आहेत, याची उत्सुकता लागली आहे. निवडणुका येऊन ठेपल्याने नागरिकांसाठी अर्थसंकल्पाद्वारे अनेक आश्वासने व सवलती दिल्या जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोरोना संक्रमण, लॉकडाऊनमुळे पालिकेचे उत्पन्न तसेच, केंद्र व राज्याकडून मिळणारे अनुदान घटले आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प कमी निधीचा असण्याची दाट शक्यता आहे. हा सत्ताधारी भाजपचा पाचवा अर्थसंकल्प असणार आहे. स्थायी समितीचे अॅड. नितिन लांडगे यांनी मंगळवारी (दि.२२) अर्थसंकल्प सादर करण्यात येईल, असे पत्र दिले आहे. त्यानुसार लेखा व नगरसचिव विभागामार्फत कार्यवाही केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.
















