- टोकन व्यवस्था आणि दिव्यांग व्यक्तींना शिधापत्रिकचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) :- सर्वसामान्य जनतेसाठी शिधापत्रिकेच्या कामकाजामध्ये सुसुत्रता आणणे व सर्व मुलभुत सुविधा नागरीकांना देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त पुरवठा विभागाचे उपआयुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी विभागातील पुरवठा शाखेला (आय.एस.ओ. ९००१- २०१५) मानांकनासाठी वेळोवेळी बैठकी घेऊन अधिकारी आणि कर्मचा-यांना सूचना व मार्गदर्शन केले.
अन्नधान्य वितरण कार्यालय, पुणे अंतर्गत परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग (शिधापत्रिका कार्यालय) हे संत तुकाराम व्यापार संकुल पहिला मजला, निगडी येथे कार्यरत आहे. या कार्यालयात (आय.एस.ओ. ९००१- २०१५) चे मानांकन प्राप्त करण्यासाठी कामकाज सुरु आहे. यामध्ये कार्यालयाची रंगरंगोटी, अभिलेखाचे अद्यावतीकरण आदी कामे युध्द पातळीवर काम सुरु आहेत. या कामकाजाच्या पाहणीसाठी अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे, तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी गुरुवारी (दि. १०) रोजी परिमंडळ कार्यालय अ व ज विभागास भेट देवुन पाहणी केली.
परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग, निगडी, शिधापत्रिका कार्यालयाचे नुतनीकरण तसेच या विभागामध्ये बँकेप्रमाणे शिधापत्रिका टोकन प्रणालीमध्ये शिधापत्रिकेचे कामकाज करणेत येत आहे. शिधापत्रिकाधारक अर्जदार कार्यालयात आल्यावर सर्वप्रथम त्यांच्या नावाची नोंद टोकन रजिस्टरमध्ये करुन त्यांना टोकनचे वितरण करणेत येते व तदनंतर सदर कार्यालयातील शिधापत्रिका लिपीक लाऊड स्पिकरद्वारे टोकन क्रमांकाचा पुकारा करुन संबंधित शिधापत्रिकाधारक/ अर्जदार यांना कार्यालयातील एक खिडकीवर त्यांच्या कामाकरीता बोलविले जात आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच सर्व शिधापत्रिकाधारक / अर्जदार यांना कार्यालयात बसण्यासाठी बेंचची व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, तक्रार पेटी, प्रथमोपचार तसेच
जेष्ठ व दिव्यांग व्यक्तीना थेट कार्यालयात प्रवेश दिला जातो. तसेच शिधापत्रिकेच्या कामकाजाबाबत विविध प्रकारचे मार्गदर्शन फलक लावण्यात आले आहेत.
टोकन वितरणाचा शुभारंभ अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे, तथा उपजिल्हाधिकारी, पुणे सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आला आहे. द्विव्यांग व्यक्तींना शिधापत्रिकेचे वितरण करणेत आले. शिबीरात परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग मिळुन एकुण १४४ दिव्यांग व्यक्तींना शिधापत्रिकेचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती अ व ज विभाग परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांनी दिली.
















