- कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याबाबत पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी HDH आरक्षण क्रमांक ७७ व आकुर्डी HDH आरक्षण क्र. २८३ येथे बेघरांसाठी घरे अनुक्रमे ३७० व ५६८ अशी एकूण ९३८ सदनिका विकसनाचे काम चालू आहे. प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर विकसित झालेल्या सदनिका या पालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणाने बाधित होवून बेघर झालेल्या लोकांसाठी वितरित करावयाचे आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये कोणत्याही स्वरुपातील स्वतःचे मालकी हक्काचे वास्तव्याचे घर नसलेल्या महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणाने बाधित झालेल्या लोकांनी चिंचवडगावातील सक्षम प्राधिकारी तथा सहा.आयुक्त, झोनिपू प्रशासन विभाग यांच्याकडे कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.
जागेचा ७/१२ उतारा अथवा मालमत्तापत्रक उतारा, फेरफार, खरेदीखत दस्त, आरक्षणाने बाधित जागेचा शासकीय मोजणी नकाशा, शासकीय मोजणी नकाशावरील विकास योजना अभिप्राय, ३० वर्षाचे टायटल रिपोर्ट, तसेच बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत देण्यात आलेल्या अनधिकृत / रस्ता बाधित जागेचे नोटीस, वरीलप्रमाणे कागदपत्रे महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर नगररचना व विकास विभागामार्फत त्यांचे मुल्यांकन करून सदरच्या रस्ता / आरक्षण बाधित क्षेत्राचे चालू रेडी रेकनर दराप्रमाणे मुल्यांकन करणेत येईल.
पालिकेच्या खाजगी वाटाघाटी बाबतच्या धोरणानुसार आरक्षण / रस्ता बाधित क्षेत्राचे खरेदीखत करुन क्षेत्र ७/१२ उतारा अथवा मालमत्ता पत्रक उतारा यावर महानगरपालिकेच्या नावे केल्यानंतर खरेदीखताद्वारे प्राप्त होणाऱ्या नुकसान भरपाई रकमेतून उपरोक्त सदनिकांसाठी निश्चित केलेली किंमत कमी करुन उर्वरित रक्कम जमिन मालकास अदा करणे अथवा नुकसान भरपाई रक्कम ही सदनिकांसाठी निश्चित केलेल्या रकमेपेक्षा कमी असल्यास उर्वरित रक्कम संबंधित जमिन मालकांकडून महानगरपालिका कोषागारामध्ये जमा करुन घेणेत येईल व त्यानंतर या प्रकल्पातील सदनिकेचे वाटप संबंधित बेघर झालेल्या जमिन मालकास करणेत येईल, असे पालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.
















