- शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांची नियुक्ती..
- शहरात राष्ट्रवादीकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांच्या हालचाली गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होत्या. अखेर त्याची सांगता झाली आहे.
राष्ट्रवादीकडून शहराध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजोग वाघेरे यांचा कालखंड पूर्ण झाल्याने अजित गव्हाणे यांची निवड निश्चित मानली जात होती. अजित गव्हाणे यांची नगरसेवकपदाची चौथी टर्म आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाकडून मराठा, मुस्लीम आणि ओबीसी कार्यकर्त्यास संधी दिल्यामुळे त्यातून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, चिंचवड विधानसभेसाठी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि भोसरी मतदारसंघाचे कार्याध्यक्ष म्हणून नेहरूनगर येथील नगरसेवक राहुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवकच्या कार्याध्यक्षपदी पिंपरी मतदारसंघातून लिंकरोड येथील निलेश निकाळजे, चिंचवड मतदारसंघातील प्रसन्न डांगे आणि भोसरीतील योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला कार्याध्यक्षपदी चिंचवडमधील ज्योती गोफणे, काळभोरनगर येथील सविता धुमाळ आणि सांगवीतील उज्जवला ढोरे यांची निवड करण्यात आली.
पुण्यातील आढावा बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. याबाबत दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन सर्व नावांची घोषणा करतील अशी माहिती समोर येत आहे.
चार महिन्यांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार शहरात आले होते. त्यावेळी भोसरीतील एका गटाने पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानंतर भोसरी विधानसभेतील स्थायी समितीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, ही बाब वाघेरे समर्थकांना कळाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. निवडणुकीच्या तोंडावर बदल करू नये, अशी विनंती केली होती. ही गोष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समजल्यानंतर साहेबांकडे जाणाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली होती.