न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) :- महाराजस्व अभियानांतर्गत (दि. ९) पुणे जिल्ह्यात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये १०१ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. जिल्हाभरात एकूण ३ हजार ५५४ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. यात २७५७ साध्या, ६७१ वारस आणि १२६ तक्रारींचा समावेश आहे.
नोंदी निर्गत करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार बुधवारी प्रत्येक तालुक्याच्या मंडळ मुख्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. हवेली तालुक्यात ४८२, पुणे शहर २२, पिंपरी चिंचवड १०१, शिरुर ४७१, बारामती ६१३, मावळ १७७, मुळशी ५२, भोर ९४, वेल्हा ६७, दौंड २४४, पुरंदर २०७ आणि खेड तालुक्यातील ३४२ नोंदी निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती कुळकायदा शाखेचे तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ७ फेब्रुवारी अखेरमुदत पूर्ण झालेल्या ११ हजार ८३५ नोंदी प्रलंबित असून यामध्ये प्रामुख्याने साध्या, वारस तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गत करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. फेरफार अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त करण्यात आले आहेत.