न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत तीन आगार आणि चारशेच्या आसपास धावणाऱ्या बसेस कमी पडू लागल्या आहेत. त्या अनुषंगाने पीएमपीचे आणखी दोन आगार आणि दोन इलेक्ट्रीकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यासह आणखी दोनशे बसेसही मिळणार असल्याने प्रवाशांना आणखी चांगल्या प्रकाराची सुविधा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुण्यासह पिंपरी – चिंचवड शहरात जवळपस १४०० बस धावत आहेत. प्रवाशांच्या तुलनेत या बसेस कमी असल्याने त्यात आणखी वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. पीएमपी प्रशासनास जवळपास ५०० बसेस मिळाल्या आहेत. त्यातील १५० बसेस रस्त्यावर धावत आहेत. दोनशे बसेस पिंपरी चिंचवड शहराला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेहरूनगर, भोसरी आणि निगडी हे तीन आगार कार्यान्वित आहेत. त्यात आणखी दोन आगारांची भर पडणार आहे. त्यातील भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र आणि निगडी सेंट्रल वर्कशॉप या दोन ठिकाणी नवीन आगार होणार आहेत तर, चर्होली, हिंजवडी फेज २ आणि मोशी येथे ई – बस चार्जिंग स्टेशन होणार आहे. पिंपरी – चिंचवड शहरात नव्याने साडेचारशेहून अधिक बस थांब्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. एमआयडीसी परिसर, उपनगर आणि शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागात बसेस मार्गावर धावल्यास त्याचा फायदा नक्कीच प्रवाशांना होवू शकतो.


















