- घंटागाड्यांमधून येणाऱ्या कच-याची मोठ्या वाहनांमधून वाहतूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२२) :- स्वच्छतेसाठी पिंपरी चिंचवडमध्ये इंदोर पॅटर्न राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत ओला व सुका कचरा वेग-वेगळा घेतला जात आहे. हा कचरा छोट्या वाहनांमधून मोठ्या वाहनांमध्ये भरण्यासाठी सहा ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संदीप खोत यांनी दिली. मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये क्रमांक पटकावण्याचा पालिकेने निर्धार केला आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
शहरातील कचऱ्याचे विलगीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांची जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृ तीसाठी खासगी संस्थांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांकडून ओला, सुका व घातक कचरा वेग-वेगळा घेतला जातो. मोठ्या सोसायट्यांमध्ये त्यांचा कचरा सोसयटीमध्येच जिरवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. त्यासाठी देखील जनजागृती करण्यात येत आहे. तसेच ओला व सुका कचरा वेग-वेगळा आल्यानंतर तो मोशी कचरा डेपोमध्ये टाकला जातो. छोट्या वाहनांमधून हा कचरा वेगवेगळा मोठ्या वाहनांमध्ये भरण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहे.
शहरातील सांगवी, काळेवाडी, पिंपरीगाव, प्राधिकरण, कासारवाडी व एमआयडीसी या ठिकाणी सहा ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहे. याठिकाणी शहराच्या विविध भागातून घंटागाड्यांमधून येणारा कचरा मोठ्या वाहनांमध्ये वेगवेगळा भरण्यात येणार आहे. अपवादात्मक एखाद्या वाहनातून कचरा एकत्र आलेला असेल तर त्याचे याठिकाणी विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा वेग – वेगळा करण्यास यश येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.


















