- शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र टार्गेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन व निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कामकाजावर लक्ष राहावे, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ८६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यावर हरकती व सूचना घेऊन २५ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षण सोडत पार पडेल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन प्रत्यक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया पडेल. शहरातील ४६ प्रभागांमधून १३९ नगरसेवक निवडण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने कामाला सुरूवात केली आहे. शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
निवडणुकीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याकरिता महापालिकेच्या दूरसंचार विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. शंभर कॅमेरे व त्यासाठी लागणारी यंत्रणा घेण्यासाठी महापालिकेने ८९ लाख २८ हजार रुपये खर्च निविदेमध्ये नमूद केला होता. त्यामध्ये मेसर्स वैभव एंटरप्रायजेस यांनी ३.५० टक्के कमी दराने सादर केली. त्यानुसार ८६ लाख १६ हजार ५८ रुपयांमध्ये त्यांनी काम करण्यास समर्थता दाखवली आहे. त्यानुसार निविदेमधील अटी व शर्तीनुसार त्यांच्याकडून करारनामा करून सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.
महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर खरेदी केलेली सीसीटीव्ही यंत्रणा महापालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा यांनी दिली.