- अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा पिंपरीत राष्ट्रवादीकडून निषेध..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर दाऊद इब्राहिमसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून आठ तास चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. या अटकेचे पिंपरी चिंचवड शहरात पडसाद उमटले आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज बुधवारी (दि. २३) रोजी पिंपरीतील आंबेडकर चौकात आंदोलन करीत घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट आदी उपस्थित होते. बीजेपी हमसे डरती होल; ईडी को आगे करती है, मोदी सरकार शर्म करो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.












