- पोलिओसाठी शहरात एकूण १०२९ लसीकरण केंद्रांची स्थापना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार रविवार दि. २७.२.२०२२ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले आहे.
पालिका परिसरात १०२९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व ६० वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २२० पर्यंवेक्षक व ३१२२ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम,बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण १०२९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९१६ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ३७ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ७६ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटींग इ. माध्यमाद्वारे करण्यात आला आहे. आपल्या घरातील व आपल्या शेजारी राहणाऱ्या ५ वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण लसीकरण करुन घ्यावे, पालकांनी लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक उपायअंतर्गत सामाजिक अंतर व मास्कचा वापरण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर व आयुक्त यांनी नागरिकांना पत्रकाद्वारे केले आहे.












