न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल साडेतीन लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली. या कालावधीत अनेक नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेकडे याबाबतच्या आलेल्या अर्जापैकी ६४० अर्ज बाद झाले होते. या अर्जदारांची नुकतीच महापालिकेने सुनावणी घेऊन अर्ज आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून घेतली आहे. यापुढील कार्यवाही वरिष्ठ पातळीवर होणार आहे.
अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचे होते. पिंपरी – चिंचवड महापालिका अंतर्गत यासाठी ६ हजार ५९ मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६४० जणांचे अर्ज बाद झाले होते.
या सर्व अपात्र झालेल्या अर्जदारांची एक समितीच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या अर्जदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत सर्व माहिती दिली. तसेच काही अर्जदारांची आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. एकही नातेवाईक मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.












