- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची येणारी निवडणुक शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची होईल, याची मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे कामकाज होईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत’. ‘महापालिका निवडणुकीसाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्यास, महाविकास आघाडी करण्यास राष्ट्रवादीचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा आज शनिवारी (दि. २६) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. मोशीतील गणेश बॅक्वेट हॉल येथे जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, संजोग वाघेरे, नाना काटे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.
तीनही पक्षातील स्थानिक पदाधिका-यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा. परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत. महापालिकेत बोगस बँक गँरटीसह भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे झाली आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी हळूहळू लोकांच्या पुढे येतील. आम्ही मुद्दामहून कोणाला अडचणीत आणणार नाही. सूड उगवणार नाही. सुडाचे राजकारण करणार नाही. महापालिकेतील चुकीच्या कामांची कायदेशीर मार्गाने चौकशी होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.