- निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याच्या तयारीत..
- लवकरच अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा जाहीर मेळावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पातळीवर सर्व आघाड्यामधील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. त्या ठिकाणी नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. त्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत केली जाणार आहे, असे राष्ट्रवादीचे नूतन शहराध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे यांनी गुरुवारी (दि.२४) सांगितले.
राष्ट्रवादी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिकेत आली आहे. त्यामुळे इतर कामकाजासोबत पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. पक्षाच्या विविध आघाडीचे पदाधिकारी आहेत. त्यातील सक्रिय पदाधिकाऱ्यांना कायम ठेवले जाणार असून, निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. त्याबाबत माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.
शहराध्यक्ष गव्हाणे व प्रवक्ते बहल म्हणाले की, भाजपचे तब्बल २५ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. ते टप्पाटप्पाने राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नगरसेवक तुषार कामठे हे ही लवकरच पक्षात प्रवेश करणार आहेत. एससी, एसटी, ओबीसी व महिला आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपचे अनेक नगरसेवक पक्षात येतील. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानंतर तिकीट वाटपात राष्ट्रवादीतील इच्छुकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. शिवसेनेसोबत आघाडीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. शिवसेनेसोबत आघाडी झाल्यास त्या दृष्टीनेही शहरपातळीवर नियोजन केले आहे. महापालिका १३ मार्चला बरखास्त होत आहे. चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची मागणी नियमानुसार स्थायी समितीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांनी केली आहे. त्यावर महापौर उषा ढोरे यांनी सभा आयोजित करण्यास होकार दिला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी शनिवार वाडा विकत घ्या म्हटल्यावर घ्यायचे का असे सांगत सभा आयोजनास नकार दिला. ही बाब योग्य नाही. त्यांनी रितसर लेखी उत्तर देणे अपेक्षित आहे, असे शहराध्यक्ष गव्हाणे म्हणाले. लवकरच अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा जाहीर मेळावा आयोजित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.