न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) :- पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात तडीपार आरोपी गणेश मोटे याच्यासह त्याच्या टोळीने १८ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ववैमनस्यातून योगेश जगताप या सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून केला. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, गणेश मोटे, महेश माने, आश्विन चव्हाण हे खेड तालुक्यातील कोये कुरकुंडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला होता. त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर आरोपींनी गोळीबार केला होता.
या गुन्हेगारी टोळीवर पिंपरी – चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केली. टोळीप्रमुख गणेश हनुमंत मोटे ( वय २३, रा. कवडेनगर, सांगवी), आश्विन आनंदराव चव्हाण (वय २१, रा. विनायकनगर, सांगवी), महेश तुकाराम माने (वय २३, रा. कवडेनगर, सांगवी), गणेश बाजीराव ढमाले (वय ३४, रा. ढमाले चाळ, जुनी सांगवी), अक्षय गणेश केगले (वय २१, रा. भीमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव), प्रथमेश संदीप लोंढे (वय २४, रा. कसबा चौक, बारामती), मुजम्मिल इस्माईल अत्तार (वय १९, रा. भारतमातानगर, दिघी), अभिजित भागूजी वारे (वय १८, रा. पिंपळे गुरव), गणेश ऊर्फ मोनू सुनील संकपाळ (वय २१, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), अभिजित बाजीराव ढमाले (ढमाले चाळ, जुनी सांगती), निखिल ऊर्फ डोक्या अशोक गाडुते (रा. जुनी सांगवी), राजन ऊर्फ बबलू रवी नायर (रा. सांगवी), नीलेश मुरलीधर इयर (रा. कवडेनगर, सांगवी) व एक अल्पवयीन मुलगा अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
या आरोपीवर कट रचून खून करणे, खनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा करून खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगून दहशत माजविणे असे पंचवीस गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत मौका कारवाई करण्यात आली.











