न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात सुमारे साडेपाच लाख मालमत्ता आहेत. एक लाखापेक्षा जास्त मालमत्ताकर असलेल्यामध्ये २७ हजार ७१४ मोठ्या थकबाकीधारकांचा समावेश आहे. औद्योगिकसह निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा समावेश आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागाने सुमारे १३ हजार मालमताधारकांना नोटीस बजावल्या आहेत.
उत्पन्न वाढीसाठी करसंकलन विभागाला सुमारे १३२० कोटींचे करवसुलीचे टार्गेट दिले आहे. आत्तापर्यंत ३९८ कोटींपर्यत वसुली झाली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसुली अभिप्रेत आहे. करसंकलन विभागामार्फत थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. करसंकलन विभागाकडील आकडेवारीनुसार एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या २७ हजार ७१४ इतकी आहे.
त्यामध्ये एक ते पाच लाख रुपयांपर्यंत मालमत्ताकर थकबाकीदारांची संख्या २० हजार ५६१ इतकी आहे. त्यामध्ये निवासी मालमत्ताधारक १० हजार ६००, औद्योगिक ६ हजार ६१८ आणि मिश्र ३ हजार ३४३ थकबाकीदारांचा समावेश आहे. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या ४ हजार १५३ इतकी आहे. त्यामध्ये निवासी १ हजार २७९, बिगरनिवासी १ हजार ६१२, मिश्र ९२९ आणि औद्योगिक ३३३ मालमत्तांचा समावेश आहे.
















