- पालिका रुग्णालयांत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीमची उभारणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२२) :- शहरातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम लागू करण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला एक कार्ड देण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णाला युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल.
रुग्णाला कोणत्या डॉक्टरांनी कोणती औषधी लिहून दिली आहेत? याची संपूर्ण माहिती या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात हे कार्ड चालणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रुग्णांच्या सर्व नोंदी ठेवणे शक्य होणार आहे. तसेच डॉक्टर रुग्णाला कोणती औषधे देतो, याची माहितीही कळणार आहे. रुग्ण उपचार घेण्यासाठी आल्यावर बहुतांश वेळा डॉक्टरांची ड्युटी बदललेली असते परिणामी, नवीन डॉक्टरांना रुग्णाचा इतिहास माहिती नसतो. पूर्वी कोणता त्रास होता? कोणती औषधे दिली होती? याची माहिती नसते. परंतु या प्रणालीच्या माध्यमातून याची संपूर्ण माहिती कळणार आहे. एखादा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला तर तेथील डॉक्टरांनाही या कार्डच्या माध्यमातून रुग्णांची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
डिजिटल हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम रुग्णांची काळजी आणि रुग्णालय व्यवस्थापनासाठी एंड – टू – एंड डिजिटल प्रणाली असणार आहे. ही प्रणाली इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून त्याचा उपयोग रुग्णालय आणि नागरिकांना होईल. ही प्रणाली पूर्व परिभाषित आरोग्य निर्देशकांचे निरीक्षण करील. रुग्णालय व उच्च व्यवस्थापन आणि प्रशासन यांना कार्यक्षम निर्णय घेण्यास सक्षम करणार आहे. सर्व रुग्णालयामध्ये यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ६ महिन्यांत यंत्राणा कार्यान्वित करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
शहरातील महापालिका रुग्णालयांना नवीन प्रणालीच्या माध्यमातून जोडण्यावर प्रशासनाचा भर आहे. डिजिटल हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन सिस्टममुळे रुग्णाना दिल्या जाणाऱ्या उपचारांची नोंद होईल. रुग्णालय व उच्च व्यवस्थापन, प्रशासनास कार्यक्षम निर्णय घेण्यास मदत होईल. कमी वेळेत यंत्रणा कार्यान्वित करण्यावर भर आहे
-विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका…
















