- शहरवासियांना लवकरच अनुभवता येणार मेट्रो प्रवास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी या सुमारे ७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेचे निरीक्षण मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी जानेवारी २०२२ मध्ये केले. त्यानंतर ही मार्गिका पूर्ण झाल्याचे शिक्कामोर्तब केले असून, ती प्रवाशांसाठी खुली करण्यास मान्यता दिली. पुण्यातील वनाझ ते गरवारे कॉलेज या सुमारे ५ किलोमीटरची पाहणी सुरक्षा आयुक्तांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये केली. हा मार्गही प्रवाशांसाठी खुला होईल.
पुणे महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिपरी सुमारे ११.४ किलोमीटरच्या मार्गावर १४ स्थानके नियोजित आहेत. शिवाय या मार्गावरील स्वारगेट ते शिवाजीनगर हा सहा किलोमीटरचा भूमिगत मार्ग असून, त्यामध्ये ६ स्थानके आहेत.
वनाझ ते रामवाडी १५.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर १६ स्थानके नियोजित आहेत. पहिल्या दोन्ही मार्गिकेतील पिंपरी ते फुगेवाडी व वनाझ ते गरवारे हे १२ किलोमीटरचे मार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुले होणार आहेत. उर्वरित २१ किलोमीटरचे मार्ग टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
















