न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. धर्मीधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एच.ए. कंपनी मैदान परिसर पिंपरी व स्पाईन रोड चिखली प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले. स्वच्छता अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरातील एक हजार श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. श्री सदस्यांनी स्वच्छता केली.
एच.ए. .कंपनी मैदानच्या १४ हजार चौ.मी.परिसर व बाजूच्या परिसरात सुमारे २० टन सुका कचरा व ओला कचरा गोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे स्पाईन रोड चिखली येथील दुतर्फा रोडची स्वछता करण्यात आली. स्पाईन रोड चिखली येथे रस्त्याच्या सात किलोमीटरचा दुतर्फा रस्ता स्वच्छ करण्यात आला. या ठिकाणी सुमारे २५ टन सुका कचरा व ओला कचरा गोळा करण्यात आला. यावेळी परिसरात पसरलेला प्लस्टिक व इतर टाकाऊ प्रकारचा सर्व कचरा जमा करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर प्रकारचे कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तो कचरा पालिकेच्या कचरावाहक गाडीमध्ये योग्य त्या ठिकाणी पाठवण्यात आला.
या कामासाठी सदस्यांचे टेम्पो व इतर साहित्य आणले होते. १५ कचरावाहक गाड्या पालीकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पालिका अधिकारी देखील यात सामील झाले होते. परिसरातील बहुसंख्य लोकांनीही उस्फूर्तपणे अभियानात सहभाग घेतला होता. श्री सदस्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले.