- आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रत्येकी चार लिपिकांची ग्रीन मार्शल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात उघड्यावर कचरा व राडारोडा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ ग्रीन मार्शल पथक तैनात केले आहेत. त्या कामासाठी पालिकेने मुख्य लिपिक व लिपिक असे ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
पालिकेने शहरातील सर्व रस्त्याने कचराकुंड्या हटविल्या आहेत. ये – जा करणाऱ्या नागरिकांसाठी हॅगींग लिटर बिन्सची व्यवस्था केली आहे. मात्र, काही बेशिस्त नागरिक पदपथावर, नदी व नाल्यात तसेच, मोकळ्या जागेत कचरा तसेच बांधकाम राडारोडा टाकत आहेत. त्यामुळे शहर अस्वच्छ व विद्रुप होत आहे. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाईसाठी पालिकेने ग्रीन मार्शल पथक तैनात केले आहे. त्या माध्यमातून शहरभरात ही कारवाई केली जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि मास्क न लावणे, विनाकारण गर्दी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आदी कारणांसाठी हे पथक दंडात्मक कारवाई करते. त्यासाठी पालिकेच्या विविध विभागातील मुख्य लिपिक लिपिक असे एकूण ३२ जणांनी ग्रीन मार्शल म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी नियुक्ती केली आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रत्येकी चार लिपिक नेमण्यात आले आहेत. त्यांचा कालावधी २५ फेब्रुवारी ते २४ मार्च असा आहे.
















