न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यातील तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, या भरतीमध्ये आरोपी सात उमेदवारांनी गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले.
फिर्यादी आणि पडताळणी समितीमधील सदस्य यांची त्याबाबत खात्री पटली. तसेच तज्ञांकडून त्याबाबत अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार सात उमेदवारांनी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या भरती सेलचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खलाटे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २८) फिर्याद दिली. त्यानुसार अर्जून छोटीराम जारवाल, प्रताप मोहन सुलाने, जगदीश पन्नुगुसिंगे, रणजितसिंग मदनसिंग महेर, सचिन विष्णू गुसिंगे, सुरेश वाल्मीक गोमलाडू, संदीप रेवप्पा होवाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत तपास करीत आहेत.