- पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांचा फंडा; वाहतूक नियंत्रित होण्याचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील काही रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येते. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पिंपरी – चिंचवड पोलिसांनी गुगल मॅपचा आधार घेतला आहे. सतत कोंडी होणाऱ्या ठिकाणांचे गुगल मॅपच्या आधारे अवलोकन केले जाणार असून, तेथील समस्या सोडविण्यासाठी तातडीने पुढील उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
शहरातील विविध मार्गावर सकाळी, सायंकाळी वाहतूक कोंडी होते. येथील कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी – चिंचवड वाहतूक शाखेने पावले उचलली आहेत. मार्गावरील वाहतुकीची परिस्थिती वेळोवेळी गुगल मॅपवर पाहून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दक्षता घ्यावी.
सकाळी व सायंकाळी जाताना येताना संबंधित मार्गावर किती वेळ लागतो, याचे मूल्यांकन करावे. त्या वेळेपेक्षा कमी वेळ कसा करता येईल, यासाठी सिग्नलचे सिंक्रोनायजेशन करून घेणे, रस्त्यावरील अडथळे हटविणे, आदी उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्याने केलेल्या नियोजनानुसार त्यांच्या कामाचे मूल्यांकन होणार आहे.