- पुणे जिल्ह्यात सर्वाधिक शाळांची नोंदणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२२) :- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ दण्यात आली आहे. २०२२-२३ या वर्षासाठी आरटीई’ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली.
त्यात ९ हजार ८४ शाळांनी नोंदणी केली असून १ लाख १ हजार ९४१ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात १६ फेब्रुवारीपासून पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत १ लाख ७३ हजार ७३४ अर्जांची पालकांकडून नोंदणी झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळांची नोंदणी करण्यास विलंब झाल्यामुळे पालकांना अद्यापही अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात ९५७ शाळांनी नोंदणी केली असून १५ हजार १३२ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी ३२ हजार ७०८ अर्ज दाखल झालेले आहेत. ठाणे जिल्ह्यात ६४८ शाळांची नोंदणी झाली असून यात १२ हजार २६७ जागांसाठी १६ हजार ५७४ अर्जाची नोंदणी झाली आहे. नागपूरमध्ये ६६३ शाळांची नोंदणी झाली असून ६ हजार १८६ शाळांसाठी २४ हजार ७७ अर्ज भरले आहेत. नाशिकमध्ये ४२२ शाळांची नोंदणी झाली असून ४ हजार ९२७ जागांसाठी १० हजार ५९० अर्ज दाखल झाले आहेत.