- स्थानिक नागरिकांचा व्यवस्थेला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२२) :- पिंपरीतील भाटनगर पुनर्वसन प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत राबविण्यात येणार आहे. काही राजकारणी लोक स्थानिक नागरिकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत. नागरिकांची दिशाभूल करीत आहेत त्यामुळे विरोध करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहे. तसेच मतदानावरच बहिष्कार टाकणार आहे, असा इशारा स्थानिक आरपीआय (गवई गट) महिला आघाडी शहराध्यक्षा रेश्मा पारधे, भीम आर्मी महिला आघाडी शहर उपाध्यक्षा अनिता रिडलान, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, श्रीरंग सूर्यवंशी यांनी दिला आहे.
भाटनगरचा प्रकल्प १९ मध्ये राबविला होता. या प्रकल्पात एकूण १७ इमारतीत १०८८ घरे आहेत. सदर इमारती दयनीय अवस्थेत असून मोडकळीस आल्या आहेत. महापालिकेने या प्रकल्पाचे दोन स्ट्रक्चरल ऑडिट केले आहेत. यामध्ये दोन्ही वेळेस सदर इमारतीत व घरे राहण्यास योग्य नाहीत, असा अहवाल आहे.
भाटनगर प्रकल्पात सध्या असलेल्या १७ इमारतींची अवस्था दयनीय आहे. इमारतींची छते पावसाळ्यातच नाही तर कायम गळतात. पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये अनेक वेळा वृद्ध माणसांचे व लहान मुलांचे हाल होत आहेत. अनेक जण जायबंदी झाले आहेत. ड्रेनेज लाईन पूर्णपणे फुटलेल्या असून, त्यातील घाण पाणी दोन इमारतींमध्ये साचून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होते.
भाटनगर प्रकल्पाचे पुनर्वसन व्हावे, ही येथील रहिवाशांची तीव्र इच्छा आहे. हा संपूर्ण प्रकल्प राज्य सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस.आर.ए.) अंतर्गत होणार आहे. येथे एस.आर.ए. प्रकल्प झाल्यास सध्या येथे राहणाऱ्या प्रत्येक गाळेधारकास वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे. जे राजकारणी या प्रकल्पांना विरोध करतील, अशा लोकांच्या विरोधात आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ, असा इशारा बैठकीत दिला आहे.












