- एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्याबाबत तब्बल ५ हजार ६८४ हरकती प्राप्त झाल्या. त्यावर राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासमोर शुक्रवारी (दि. २५) सुनावणी झाली. त्याचा अहवाल मंगळवारी (दि. २) राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात प्रभागांचे सीमांकन अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एससी, एसटी व महिला आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती- सूचनांचा सुनावणी अहवाल पाच मार्च रोजी सादर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तशी मुदतवाढ महापालिकेला दिली आहे. दरम्यान, प्रभाग रचनेत १५ ते २० टक्क्यांपर्यंत बदल होतील असा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी केला आहे.
राज्यातील १४ महापालिकांसह स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येणार नाहीत. महिनाभर निवडणुकीचा कार्यक्रम चालण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुटीत अनेकजण बाहेरगावी जातात त्यामुळे शाळाचे निकाल लागण्याआधी निवडणूक घेण्याचा आग्रह राजकीय पक्षांनी धरला असून, त्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
राज्यातील आगामी निवडणुकांच्या विचारविनिमयासाठी राजकीय पक्षांच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधींची राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. मदान यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या कार्यालयात बुधवारी बैठक झाली. बैठकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, सीपीआय आणि बसपाचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकाचवेळी निकाल देण्याकडे सर्व पक्षांचा कल होता, असे समजते.












