- वाचा…कोणती बांधकामे नियमित होणार? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२२) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील फक्त निवासी झोनमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दि. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेली बांधकामे नियमित करता येणार आहेत. त्यासाठी दि. ३१ मेपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अटी, शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
राज्य शासनाने गुंठेवारी अधिनयम २००१ मध्ये अलिकडेच सुधारणा केल्या आहेत. पीएमआरडीएने त्यामुळे आपल्या हद्दीतील गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. नोंदणीकृत वास्तुविशारद किंवा नोंदणीकृत स्थापत्य अभियंतामार्फत अर्ज दाखल करावे लागणार आहे. या निर्णयाचा फायदा प्राधिकरणाच्या हद्दीतील सुमारे ७०० पेक्षा अधिक गावांमधील अनधिकृत बांधकामांना होणार आहे.
नियमितीकरण केल्याने अनधिकृत बाधकामधारकाना भविष्यकाळात खरेदी – विक्री व्यवहारांमध्ये अधिकृतता राहणार आहे. तसेच कर्ज प्रकरणे, तारण व्यवहार आदी बाबी सुलभ होणार आहेत. गुंठेवारी नियमितीकरण करण्याकरिता प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या नियमितीकरणाचा फायदा घ्यावे असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त. सुहास दिवसे यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा, दि. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचा कर संकलनाचा दाखला, वीजबिल, स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्थैर्य प्रमाणपत्र दाखला (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट), मोजणी नकाशा, इमारतीच्या उंचीचा दाखला (एलिव्हेशन सर्टिफिकेट), जागेवरील बांधकामांची स्थिती, व्यापी, मजले दर्शविणारे मिळकतींचे तारखेसह छायाचित्र,
ही बांधकामे नियमित होणार नाहीत
रेड झोन, बफर झोन, हिल टॉप, हिल्स स्लोप झोन, शेती तथा ना विकास झोन, वनीकरण झोन, शासकीय / खासगी वने, प्रादेशिक योजनेतील तसेच प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते व आरक्षणे, पात्र, सरकारी जागा आदी झोनमधील बांधकामे पीएमआरडीएने नियमितीकरणातून वगळली आहेत. त्यामुळे येथील बांधकामे नियमित होणार नाहीत.












